कोट्याधीश होण्याच्या स्वप्नापोटीच खवले मांजर, मांडूळ सापाची तस्करी 

रत्नागिरी:- शिकारीचा छंद त्यातच आंतराष्ट्रीय बाजारपेठेत  खवल्या मांजर, मांडूळ सापला मोठी किमंत मिळते याची माहिती मिळाली. त्यानंतर या टोळक्याने खवल्या मांजरासह मांडूळ साप पकडून लक्षाधीश  होण्याचे स्वप्न बाळगळे होते. काजरघाटी परिसरातच खवल्या मांजरासह साप पकडल्यानंतर त्यांनी खरेदीदार ग्राहकांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी अनेकांशी संपर्क साधला होता. या टोळीने गिर्‍हाईक दगाबाज तर नाही ना हे तपासण्यासाठी चक्क पैशांचे व्हिडीओ मागून घेतले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तब्बल करोडो रुपयांच्या बोलीवर हा व्यवहार ठरला. दरम्यान याप्रकरणी अटकेतील ८ संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली. 

बुधवारी शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत खवल्या मांजरासह मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या. तब्बल ८ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. शहरासह ग्रामीण भागातील मंडळी यात सहभागी होती. त्यामुळे याची पाळेमुळे खोदून काढणे पोलिसांसमोर आव्हानात्मक बनले आहे. 

या रॅकेटमधील सर्वच आरोपी हे चांगलेच सराईत असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्यावेळी पोलिस ग्राहक म्हणून त्यांच्याशी बोलणी करत होते त्यावेळी समोरुन पोलिसांचीच उलट तपासणी झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

अखेरीस खवल्या मांजरासह मांडूळ जातीच्या सापाची बोली एका विशिष्ट रकमेवर तय करण्यात आली. १ कोटी रुपयांच्या पुढे हा व्यवहार ठरला होता. मोठे गिर्‍हाईक या आशेने सारेच खुशीत गाजरं खात होते.
यातील संशयित आरोपी हे भलतेच पोचलेले होते. ज्या गिर्‍हाईकाशी व्यवहार ठरला आहे ते गिर्‍हाईक पक्के आहे ना याची खात्री करण्यासाठी चक्क पैशांचे व्हिडीओ मागवून घेतले होते अशी माहिती देखील तपासात पुढे आली आहे.