रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर कुवारबाव येथे गुरूवारी (ता. ९) रात्री गवारेडा फिरत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. या परिसरात सतत वाहनांची रेलचेल सुरू असते. गव्याचा वावर कायम राहिल्यास मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण होणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चिपळूण, संगमेश्वर, लांजा परिसरामध्ये सतत गव्याचे दर्शन होत आहे. चिपळूण शहराजवळ महामार्गावर गवा फिरताना दिसला होता. काल रात्री रत्नागिरी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर रेल्वेस्थानकानजीक परिसरात महामार्गावर अचानक एक गवारेडा दिसला होता. कुवारबावपासून काही अंतरावर पोमेंडी परिसर जंगलभाग असल्याने तिथून तो फिरत फिरत भरवस्तीत आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. काल रात्री या परिसरातच फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मुख्य रस्त्यावरून तो ग्रामपंचायत इमारतीच्या दिशेने गेला. पहाटेच्या सुमारास ग्रामपंचायतनजीक दुचाकीस्वाराला धडक देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, दुचाकी वेगाने पुढे गेल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले होते. ग्रामपंचायतीजवळचे सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आले आहेत. खाद्य शोधत तो कुवारबाव परिसरात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तो गवा पोमेंडीच्या दिशेने जंगलात गेल्याचे वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे जंगलतोड वाढलेली आहे तसेच महामार्गाची कामे सुरू असल्याने जंगली प्राण्यांचा पारंपरिक मार्ग बदललेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सकाळी गवा कोणत्या दिशेने गेला याची आम्ही पाहणी केली. तो पोमेंडीतून जंगलात गेल्याचे निश्चित आहे. जंगल लागून असल्याने ते हमखास सांगू शकतो. आपण जंगलाच्या बाजूला राहतो त्यामुळे तो बिथरून आला असावा. –प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी