रत्नागिरी तहसीलदारांचे चौकशीचे आदेश
रत्नागिरी:- वाटद येथील कोतवाल दीपक लक्ष्मण गमरे यांनी कुळांच्या जमिनीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पाच अर्जदारांसह ३० लोकांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे करण्यात आली होती. याबाबत रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी वाटद येथील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असून, पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच काेतवालाची जयगड येथे बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
कोतवालांना गावातील जमिनीसंदर्भात अधिकार, अभिलेख, कागदपत्रे सहज उपलब्ध होतात. गावामध्ये कोणत्या कुळाची कुठे वहिवाट आहे; अनेक वेळा प्रत्यक्ष जागेवर कुळाची वहिवाट असूनही त्यांचे नाव सातबाऱ्यावर नमूद करण्याचे राहिलेले असते, याची माहिती कार्यालयातून शोधून त्या ठिकाणी कूळ लावण्यास अर्ज दाखल करून उच्च महसुली अधिकाऱ्यांच्या मदतीने या जमिनी बळकाविण्याचे काम गमरे हे करतात. तसेच या कुळांबाबत माहिती घेण्यास कोणी आल्यास त्यांना जाणीवपूर्वक उलट-सुलट कारणे देऊन त्यांची दिशाभूल करतात, असे आरोप या निवेदनात करण्यात आले होते.
अर्जदार हे शेतकरी असून, ते पूर्वापार या जमिनीत भातशेती, नाचणी, काजू, आंबा ही वडिलोपार्जित पारंपरिक शेती करीत आहेत. या ठिकाणी वहिवाट दाखविण्याचा काेतवाल गमरेचा काहीही संबंध नसतानाही त्यांनी येथे जाणीवपूर्वक वहिवाट दाखविली आहे. तक्रारींवर काही सुनावण्या झाल्या असून, पहिला आदेश शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे.
तक्रारदार यांचा हक्क अंशत: मंजूर करण्यात आला आहे. तसेच २००५ ला सेवेत दाखल झाल्यानंतर कूळ कायद्याने ज्या मालमत्ता प्राप्त केलेले आहेत. त्या प्राप्त करण्यापूर्वी किंवा विक्री करून घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याचे दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील १९ व ३ नुसार उल्लंघन केल्याचे दिसत असल्याने कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी दिले आहेत. तसेच वाटद या गावात त्यांचे हितसंबंध तयार झालेले असल्याने १९५९ मधील तरतुदीनुसार त्यांची बदली जयगडला केली आहे. ७० ब खाली केलेल्या दाव्यांच्या सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.