‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशाला पालकांकडून थंड प्रतिसाद

रत्नागिरी:-शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणार्‍या 25 टक्के प्रवेशांसाठी जिल्ह्यात 914 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी एकूण 1038 अर्ज दाखल झाले होते. या पैकी 671 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ 35 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे आरटीई प्रक्रियेला पालकांकडून थंड प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे.

‘आरटीई’अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ चार दिवस उरले आहेत. त्यात एक दिवस दिवस सुट्टी असल्याने प्रवेशांसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. आरटीई प्रवेशांसाठी यंदा राज्यामध्ये 1,01,906 जागा उपलब्ध आहेत. या पैकी 90 हजार 685 जागांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यातील केवळ 13 हजार 700 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, अजूनही अंदाजे 77 हजार जागा रिक्त आहेत. यामुळेे प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे.
काही पालकांना कागदपत्रांच्या अडचणी भेडसावत असून, प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्यानेही काही प्रवेश रखडले आहेत. आरटीई प्रवेशांची ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली, तर प्रवेशांच्या मुदतीअंती बर्‍याचशा जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालकांकडून दाखवण्यात येत असलेल्या या अनास्थेमुळे लॉटरीत नाव न लागलेल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे पालकांनी तातडीने आपल्या पाल्याला मिळालेल्या शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.