चिपळूण:- अन्न व औषध प्रशासनाने चिपळूण तालुक्यातील मुरादपूर भोईवाडी येथील एका घरावरती छापा टाकून पान मसाला आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला असून दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 44 हजार रुपये किमतीचा हा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आहे.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विजय पाचुपते (41) यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश रवींद्र शेडगे (२०, र.मुरादपूर भोईवाडी) यांच्या घरामध्ये बेकायदेशीर पदार्थ ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विजय पाचुपते आणि त्यांच्या टीमने गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या घरावर छापा टाकला. त्यावेळी प्रथमेश शेडगेच्या घराच्या पडवीत 12 जुलै 2024 च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. या पदार्थांची आणि पान मसाल्याची किंमत 43 हजार 560 रुपये इतकी करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रथमेश रवींद्र शेडगे आणि त्याचा सहकारी स्वप्निल गंगाराम मोरडेकर यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर चिपळूण पोलिसांनी काळात 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 123 , 274, 275 , 223 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2 ) (i), 26 (2) (iv), 27 (3) (d), 30(2 ) (a), 3 (1), (zz) (iv) 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.