अनेक शाळा, महाविद्यालयातील सुरक्षा समित्या कागदावरच

रत्नागिरी:- शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांसमवेत होणार्‍या गैरप्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासन स्तरावरील उपाययोजनांची शाळा महाविद्यालय स्तरावर काटेकोर अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था आहे. अनेक समित्या कागदावरच असल्याचे वास्तव आहे. यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षितेबाबत जागरुक राहणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह समोर येत आहे.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास, युवक कल्याण कक्ष, रॅगिंग कमिटी, शिस्त कमिटी, विद्यार्थींनी विकास मंच, तक्रार पेटी अशा समित्या स्थापन आहेत. तर शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार निवारण समिती, सखीसावित्री समिती, माता-पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती यासह विविध समित्या कार्यरत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात या समित्या स्थापन केल्या जातात. मात्र त्यांची आंमलबजावणी होत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले. त्यामुळे बहुतांश समित्या ह्या कागदावरच दिसून येतात.

याआधी बदलापूर प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत होता. यानंतर शासनाने या सुरक्षिततेच्या उपाययोजनेबाबत अनेक निर्णय घेतले. असे असतानासुद्धा शहरात नुकत्याच एका शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थींनीबरोबर गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. याची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना देताच शाळेत याची वाचा फोडली. मुळात इतक्या समित्या असताना त्यांना कसे काय समजले नाही हा एक प्रश्नच आहे. एकंदरीत या समित्या कागदावर असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे शहरातील त्या प्रकारात पालकांना कायदा हातात घ्यावा लागला.

व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसह अनेक सोशल माध्यमे उपलब्ध असून, त्यावर शालेय विद्यार्थ्यांसह तरुणाई अधिक अ‍ॅक्टीव्ह असते. या माध्यमाचा वापर करून अनोळखी व्यक्तींशी ओळख व त्यातून वाढणारा संवाद पुढील काळात धोकादायक ठरत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग उघड झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये यासाठी शालेय जीवनापासूनच चुकीचे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाईचा वचक घालून अशा विकृत मनोवृत्तींना आवळ घालण्याची गरज निर्माण झाली आहे.